- प्रफुल बानगावकरलोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : पाषाणभेद, सफेद मुसळी, अश्वगंधा, काळमेघ आदी वनौषधी शेतीचा यशस्वी प्रयोग साकारून कारंजा तालुक्यातील मंगुटपूर येथील पंकज मांजरे या युवा शेतकºयाने इतर शेतकºयांसमोर आदर्श शेतीचा उत्तम नमुना ठेवला.मंगुटपूर येथील पंकज मांजरे या युवकाने अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर आपला मोर्चा शेतीकडे वळविला. पारंपारिक पद्धतीने शेती न करता नवनवीन प्रयोग करून शेतीची कास धरली. वनौषधी शेतीसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर, त्या अनुषंगाने इत्यंभूत माहिती घेतली. पाषाणभेद, सफेद मुसळी, अश्वगंधा, काळमेघ ही वनौषधी आणि त्यासाठी उपलब्ध बाजारपेठ याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सन २०१७-१८ च्या सुमारास त्यांनी वनौषधी शेतीचा प्रयोग अंमलात आणला. दोन एकरात सफेद मुसळी आणि प्रत्येकी एका एकरात पाषाणभेद, अश्वगंधा व काळमेघ या वनौषधीची लागवड केली. आंतरपिक म्हणून सागवान झाडांची लागवड केली. पाच एकर वनौषधी शेतीतून लागवड व मशागत खर्च वजा जाता पावणे पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सफेद मुसळी शेतीसाठी दोन लाख रुपये लागवड व मशागत खर्च येतो आणि उत्पादन पाच लाखाचे होते. निव्वळ नफा तीन लाख रुपये मिळतो. पाषणाभेद शेतीत ४२ हजार रुपये नफा, अश्वगंधा शेतीतून ६५ हजार व काळमेघ शेतीतून ५५ हजार रुपये नफा मिळतो, असे मांजरे यांनी सांगितले. या वनस्पतीवर किडींचा प्रादुर्भाव होत नसल्याने फवारणी खर्च नाही तसेच या पिकांकरीता शेणखत हे उत्तम खत म्हणुन वापरले जाते. वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. वनौषधीकरीता कोणतेही जमिन त्यातल्या त्यात पाणी निचरा करणारी जमिन अतीउत्तम, असे मांजरे यांनी सांगितले.कानपूर, मुबंई व दिल्ली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध आहे. पाषाणभेद हे रक्त शुद्धीकरण, वजन कमी करण्यासाठी तसेच सफेद मुसळी हे शक्तीवर्धक म्हणून वापर केला जातो. परराज्यात विक्री केली जाते. तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके म्हणाले की, मांजरे यांनी नवीन प्रयोग करून इतरांसमोर प्रेरणा निर्माण केली. वनौषधी शेतीतून ते भरघोष उत्पादन घेत असून, कृषी विभागातर्फे मार्गदर्शन केले जाते.
पाच एकरात वनौषधीची लागवड; कारंजातील शेतकऱ्याचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 4:19 PM