वाशिम : स्थानिक श्रावस्ती नगरातील निवासस्थानाजवळून गेलेली उच्च दाबाच्या वीज वाहिणीची तार अद्यापही अन्यत्र हलविण्यात आली नाही. यासंदर्भात श्रावस्ती नगरातील नागरिकांनी १६ मे रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत ठोस कार्यवाहीची मागणी केली.श्रावस्ती नगरातील देवढे यांच्या मालकीच्या घराच्या अगदी जवळून ११ केव्ही विद्युत वाहिनीची तार सिव्हील लाईनस्थित श्रावस्तीनगर - वाटाणे ले आउटमधून गेलेली आहे. या विद्युत वाहिनीच्या तारेमुळे वारंवार शॉटसर्किट होवून स्पार्किंग होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे घराला आग लागण्याची किंवा जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात पार्किंग होत असल्याचा प्रकार संबंधित विभागाच्या निदर्शनात वारंवार आणून दिला. मात्र, अजूनही काहीच कार्यवाही नसल्याचे निवेदनकर्त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवासस्थानाजवळून उच्च दाब वाहिणीची विद्युत तार नेऊ नये, असा शासनाचा नियम आहे. मात्र, श्रावस्ती नगरातील निवासस्थानाजवळून उच्च दाबाची विद्युत तार गेली आहे. विद्युत तार इतरत्र हलविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अजूनही निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात आमदार अमित झनक यांच्याकडेही नागरिकांनी व्यथा मांडल्या. झनक यांनी यांसदर्भात अधीक्षक अभियंत्यांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तथापि, या सूचनांकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला. गतवर्षी ऊर्जा मंत्री वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, श्रावस्ती नगरातील नागरिकांनी यासंदर्भात निवेदन दिले होते. या निवेदनालादेखील केराची टोपली दाखविण्यात आल्याचे निवेदनकर्त्यांनी १६ मे रोजीच्या निवेदनात नमूद केले. १८ मे रोजी ऊर्जामंत्र्यांना यासंदर्भात श्रावस्ती नगरातील चिमुकले निवेदन देणार आहेत. निवेदनावर भगवान देवढे, जगदीश मापारी, अंबादास कुऱ्हे, दुर्गा कुऱ्हे, आशिष कुऱ्हे, नंदा ढोबळे, रामकृष्ण ढोबळे, वनिता दाभाडे, स्वाती ढगे, वैशाली ढगे, सत्यभामा देवढे, मोहिनी देवढे यांच्यासह १५० नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत. विद्युत निरीक्षण विभागाने नोंदविलेले मत...विद्युत निरीक्षकांनी श्रावस्ती नगरात केलेल्या पाहणीत उच्चदाब वाहिणीच्या बाबतील काही दोष आढळून आले आहेत. ते खालील प्रमाणे...१) श्रावस्ती नगरातील पुंडलिक देवढे यांच्या घरानजीकच्या ११ केव्ही उच्चदाब वाहिनीच्या एका आर.एस.जे पोलचा स्टे तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे वाहिणीचे पोल झूकून या ठिकाणी संवाहकाचे झोल निर्माण झाले आहेत.२) देवढे यांच्या घरानजीकच्या ११ केव्ही वाहिणीच्या संवाहकाचे, पुंडलिक देवढे घरापासूनचे समांतर अंतर हे नियमानुसार योग्य नसल्याचे दिसून येते.३) देवढे यांच्या घरानजीकच्या ११ केव्ही उच्चदाब वाहिणीस गार्डींग पुरविण्यात आलेली नाही.
उच्च दाबाच्या वीज वाहिन्या ‘जैसे थे’!
By admin | Published: May 18, 2017 1:22 AM