संतोष वानखडे
वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत चार लाखांवर नागरिकांनी लस घेतली असून, यामध्ये १.७९ लाख महिलांचा समावेश आहे. वाशिम तालुक्यात सर्वाधिक तर मानोरा तालुक्यात सर्वात कमी महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण कोरोना बाधित रुग्ण ७,१४३ होते तर एकूण १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारांवर रुग्ण आढळून आहे. एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे लसीकरणावर ही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. आता दुसरी लाट ओसरत असताना, संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. आतापर्यंत चार लाखांवर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये १.७९ लाख महिलांचाही समावेश आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला लसीकरणाबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. वाशिम तालुक्यातील सर्वाधिक महिलांनी (४३,०६७) तर मानोरा तालुक्यात सर्वात कमी महिलांनी (१५,९७१) कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. लसीकरणाबाबत महिलांची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न
०००००००००००००००००
बॉक्स
एकाच लसीचा आग्रह धरू नये !
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीला प्राधान्य दिले जात आहे. दोन्ही लस पूर्णत: सुरक्षित असून, कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही एका विशिष्ट लसीचा आग्रह धरू नये. उपलब्धतेनुसार लस घ्यावी. कोणत्याही अफवा, गैरसमजावर विश्वास ठेवू नये, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला.
०००००
बॉक्स
ग्रामीण भागातील महिला उदासीन!
कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिला उदासीन असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. ग्रामीण महिलांनी कोणतीही भीती न बाळगता लस घेणे आवश्यक ठरत आहे.
०००००
कोट बॉक्स
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. लसीबाबत कोणताही भेदभाव न करता उपलब्धतेनुसार पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.
००००००
तालुकानिहाय लसीकरण
वाशिम ४३,०६७
कारंजा ३५,०१२
मंगरूळपीर २७,६०४
मानोरा १५,९७१
रिसोड ३६,०६९
मालेगाव २२,०६८