वाशिम, दि. १५- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून बाद ठरविलेल्या ५00 व १000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मंगळवारी जिल्हाभरातील विविध बँकांनी एकच गर्दी केली. सोमवारी बँका बंद राहिल्याने मंगळवारी नागरिकांच्या गर्दीचा उच्चांक पाहावयास मिळाला.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५00, १000 रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास जाहीर केला आणि सर्वत्र एकच गोंधळ उडाला. या निर्णयामुळे सर्वच स्तराच्या बाजारपेठा, व्यवहार मंदावले. चलनातून बाद ठरविलेल्या ५00 व १000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि नवीन नोटा प्राप्त करण्यासाठी नागरिकांनी १0 नोव्हेंबरपासून बँकांमध्ये एकच गर्दी केली. शनिवार व रविवार या दोन दिवशी सुट्टी असतानाही बँका सुरू राहिल्या. सोमवारी बँका बंद राहिल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी बँका सुरू राहणार असल्याने सकाळपासूनच नागरिकांनी बँकेसमोरच्या रांगेत राहणे पसंत केले. वाशिम शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन्ही शाखा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, सिंडीकेट बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, इलाहाबाद बँक, आयसीआयसीआय बँक या प्रमुख बँकांसह, वाशिम अर्बन व खासगी सहकारी बँकांसमोर नागरिकांची एकच गर्दी पाहावयास मिळाली. हीच परिस्थिती रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर शहरासह ग्रामीण भागातील बँकांमध्ये पाहावयास मिळाली. रांगेत राहण्यासाठी वेळ नसल्याने अनेकांनी मजुरी देऊन काही नागरिकांना रांगेत उभे केले.
सुट्टीनंतर बँकांमध्ये गर्दीचा उच्चांक!
By admin | Published: November 16, 2016 3:04 AM