वाशिम : कोरोनामुळे साधारणत: मे महिन्यापासून आॅनलाईन वर्ग सुरू आहेत. या दरम्यान कोणत्याही सण, उत्सवाच्या सुट्ट्या नसल्याने किमान दिवाळीची सुटी तरी देण्यात यावी, असा सूर शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मे महिन्यापासून अनेक खासगी शाळांनी आॅनलाइन वर्ग सुरू केले. सलग सहा महिने आॅनलाइन वर्ग सुरू आहेत. या सहा महिन्यांमध्ये कोणतीही मोठी सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. सकाळ, दुपार, सायंकाळ अशा तीन सत्रात विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. एरव्ही आॅफलाईन शिक्षण पद्धतीत सण, उत्सव काळात सुटी देण्यात येते. आॅनलाईन शिक्षण पद्धतीत मात्र सण, उत्सवादरम्यान मोठी सुटी देण्यात आली नसल्याने शिक्षकांसह पालक, विद्यार्थ्यांमध्येही नाराजीचा सूर आहे. गणेशोत्सवदरम्यानही सुटी नव्हती. आता दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. दिवाळीदरम्यान १० ते १५ दिवसांची सुटी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक, विद्यार्थी, पालकांमधून होत आहे. अनेक शाळांनी आॅनलाइन प्रथम सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर काही पालकांनी प्रथम सत्र परीक्षा दिवाळीनंतर शाळा सुरु झाल्यावर घेण्यात यावी, अशी विनंती शाळांना केली आहे. मात्र शाळा वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचे दिसून येते. गत सहा महिन्यांपासून आॅनलाईन वर्ग सुरू आहेत. सण, उत्सवादरम्यान या वर्गांना सुटी देणे गरजेचे आहे. दिवाळी सण लक्षात घेता आॅनलाईन वर्गाला सुटी देण्यात यावी.- गजानन तुर्केपालक, वाशिमयंदा आॅनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. शिक्षकदेखील आॅनलाईन, समुदाय पद्धतीने शिक्षण देत आहेत. दिवाळीदरम्यान आॅनलाईन वर्गाला किमान १५ दिवसाची सुटी मिळावी. - सतीश सांगळेशिक्षक वाशिम