लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील कापशी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम जलसंधारण विभागाने हाती घेतले आहे. गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी २६ मे रोजी या कामाला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, जलसंधारण विभागाचे श्री. मापारी, रवी भुसारी, कारंजाचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, डॉ. राजीव काळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कापशी नदीचे सुमारे २ किलोमीटर पर्यंत रुंदीकरण व खोलीकरणचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सुमारे ८०० टीसीएम पाणीसाठा निर्माण होईल. नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्याने आजूबाजूच्या शेतीला सिंचनाची सोय होणार आहे. तसेच पुराचा धोकाही कमी होईल, अशी माहिती जलसंधारणचे मापारी यांनी यावेळी दिली. गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.