मार्च २०२० नंतर लाॅकडाउन काळात पोलिसांना होमगार्डची मदत घ्यावी लागली होती. जवळपास मागील वर्षभरापासून काही अल्पसा कालावधी वगळता पोलीस अपुऱ्या मनुष्यबळाअभावी होमगार्डची मदत घेत आहेत. आता पुन्हा जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात पाय पसरले आहे. लहान गावांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी प्रशासनाने काही कडक निर्बंध जाहीर केले आहे, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पोलीस कर्मचारी नाही. निर्बंधाची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून पोलिसांच्या मदतीला पुन्हा होमगार्डला पाचारण करण्यात आले आहे.
शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोलिसांच्या मदतीसाठी २० होमगार्ड्स देण्यात आले आहेत. हे होमगार्ड पोलिसांच्या मार्गदर्शनात कोरोना काळात चांगल्याप्रकारे कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांसोबत बाजारात, विविध चौकात वाहतूक सुरळीत ठेवणे, विना मास्क, तीबलसीट दुचाकी चालविणाऱ्यांकडे लक्ष देणे आदी कामे ते करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील विविध गावांतून येणाऱ्या होमगार्डना दिवसाकाठी ६७० रुपये मोबदला देण्यात येतो, मात्र मागील १४० दिवसांचा मोबदला होमगार्डना मिळाला नाही. त्यामुळे होमगार्ड व त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकप्रकारे होमगार्डही फ्रंटलाईन कोरोना वारियर्स ठरत असल्याचे दिसून येत आहे.