साहेबराव राठोड / मंगरुळपीरतीन वर्षांपूर्वी चार एकरात डाळिंबाची लागवड केली. गारपिटीने त्यावर गतवर्षी संकट आले. तरीही न डगमगता जवळपास नष्ट झाल्यात जमा झालेल्या डाळिंबाच्या झाडांना पुनरुज्जीवन दिले व सहसा शेतकरी टाळणारा डाळिंबाचा आंबीया बार घेत युवा शेतकरी शरद प्रतापसिंग बाबर यांनी पडतीच्या काळात आपल्या मालाला चांगला भाव मिळवून घेतला. एवढेच नाही तर त्यांच्या कल्पक व नियोजनपूर्ण शेतीमुळे त्यांच्या मालाला हाँगकाँगच्या बाजारपेठेची मागणी आली. परंपरागत वीटभट्टीच्या व्यवसायाला फाटा देत मंगरुळपीरच्या बाबरे परिवाराने शेतीव्यवसायाचा मार्ग निवडला. तीन भावंडांच्या २५ सदस्यांच्या एकत्र कुटुंबात जवळपास १२0 एकर शेती. शेतीचा व्यवसाय मुख्य असला तरी कुटुंबातील युवा पिढी चांगली शिक्षित. सातत्याने कल्पकतेने शेतीचा ध्यास घेतलेल्या बाबरे परिवारातील प्रतापसिंग बाबरे यांच्या शरद बाबरे या बी. एस. सी. अँग्री झालेल्या युवा शेतकरी मुलाने तीन वर्षांपूर्वी मंगरुळपीर तालुक्यातीलच मंगळसा येथील डिगांबर गिरी व वनोजा येथील अनिल राऊत या डाळिंब शेतीचा चांगलाच अनुभव असलेल्या शेतकर्यांच्या मार्गदर्शनातून मंगरुळपीर-कारंजा मार्गावरील चार एकर शेतीत भगवा गुटीकलम या जातीच्या डाळिंबाची लागवड केली. यावेळी त्यांना सध्या तोड सुरु असलेल्या चार एकराच्या डाळिंब शेतीतून १२0 टन डाळिंबाचे उत्पादन अपेक्षीत आहे. मृग बार घेणार्या शेतकर्यांना एकीकडे ४२ ते ४५ रुपये प्रती किलोचा भाव मिळालेल्या इतर शेतकर्यांच्या तुलनेत आंबीया बार घेतल्याने बाबरे यांना ६७ रुपये किलोचा भाव मिळाला. आपल्या शिक्षण व संपर्काच्या बळावर शरद बाबरे यांनी परदेशातील हाँगकाँगच्या बाजारपेठेत आपल्या डाळिंबाला मागणी होऊ शकते का, याची चाचपणी केली. त्याचा परिपाक म्हणून शरद बाबरेंचे आंबीया बाराचे डाळिंब हाँगकाँगच्या दिशेने कूच करीत आहे. याचबरोबर मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील नागपूर व मुंबईच्या बाजारपेठेतही बाबरेंच्या डाळिंबाला चांगली मागणी असल्याचे ते म्हणाले.
मंगरुळपीरच्या डाळिंबाची हाँगकाँग वारी
By admin | Published: November 07, 2014 1:11 AM