---------
रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावित
वाशिम : मालेगाव तालुक्यात मेडशीसह इतर काही ठिकाणी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची ३५ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य सेवा प्रभावित होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शेख गणीभाई मित्रमंडळाने मंगळवारी केली.
---------
वर्गखोल्यांसाठी निधी मिळेना
वाशिम : विविध ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे निधीची मागणी नोंदविली आहे. अद्याप निधी मिळाला नसल्याने वर्गखोल्यांची दुरुस्ती रखडली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी सरपंचांनी गुरुवारी केली.
---------------
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
वाशिम : गतवर्षी अवकाळी पावसामुळे पांगरी, राजुरा परिसरात फळबागेसह पिकांचे नुकसान झाले होते. कृषी विभागातर्फे नुकसानग्रस्त भागाची पाहणीही करण्यात आली; परंतु अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाइ मिळू शकली नाही.
---------------
जीपीएफच्या पावत्या शिक्षकांना द्याव्यात!
वाशिम : जि.प. प्राथमिक शिक्षकांचा ७ व्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता जीपीएफमध्ये जमा करावा, मार्च २०१८ पासून जीपीएफ हप्ता जमाच्या विवरण पावत्या देण्यात याव्यात, अशी मागणी सतीश सांगळे यांनी २ जुलै रोजी केली.
---------------
महिलांना मार्गदर्शन
वाशिम : महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी केंद्रात बुधवारी महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. या कार्यक्रमात मातांना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
------------
पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान
वाशिम : कारंजा तालुक्यातील धामणी खडी परिसरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे फळपिकांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित
वाशिम : अनुदान, जुनी पेन्शन योजना यासह शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. सदर मागण्या निकाली काढण्याची मागणी जुनी पेन्शन योजनेपासून वंचित शिक्षकांनी ३० जून रोजी केली.
------------
रस्त्याअभावी शेतकऱ्यांची गैरसोय
वाशिम : रिसोड तालुक्यातील महागाव ते रत्नापूर मारमाळ पाणंद रस्ता नाही, तसेच महागाव ते सोनाटी शिवेपर्यंत खडीकरण नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. खरीप हंगामात यामुळे अनेक अडचणी उद्भवत असल्याने संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी पं.स. सदस्यांनी केली आहे.