साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंतांना वृद्धापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये म्हणून वृद्ध साहित्यिक व कलावंतांना राज्य सरकारतर्फे मानधन दिले जाते. जिल्हास्तरीय निवड समितीतर्फे साहित्य, कला किंवा वाड्.मय क्षेत्रात १५ ते २० वर्षे या कालावधीत महत्त्वपूर्ण कामगिरी करणा-या जवळपास ६० जणांची दरवर्षी निवड केली जाते. साहित्य, कलाक्षेत्रातील पुरावे, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला व कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण या आधारावर निवड झाल्यानंतर राष्ट्र, राज्य व जिल्हास्तर अशा तीन प्रकारात मानधन देण्यात येते. जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील एक, राज्य स्तर चार आणि जिल्हास्तरावर ५८७ वृद्ध साहित्यिक व कलावंत आहेत. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे मानधन वितरित केले जात होते. गत काही महिन्यांपासून यामध्ये बदल केला असून, आता ते संचालक कार्यालयाकडून दिले जात आहे. गत नोव्हेंबर महिन्यापासून मानधन थकीत असल्याने वृद्ध साहित्यिक व कलावंतांसमोर आर्थिक पेच निर्माण होत आहे. उदरनिर्वाहासाठी लागणारे साहित्य विकत घ्यावे कसे, असा प्रश्न वृद्ध कलावंतांसमोर उभा ठाकला आहे.
००००००००००००००
मानधन दिले जाणारे राष्ट्रीय स्तरावरील कलावंत, साहित्यिक -१
मानधन दिले जाणारे राज्य स्तरावरील कलावंत, साहित्यिक - ४
मानधन दिले जाणारे जिल्हा स्तरावरील कलावंत, साहित्यिक - ५८७
२) मानधन किती (प्रती माह)
राष्ट्रीय पातळीवरील कलाकार, साहित्यिक - २,१०० रु.
राज्य पातळीवरील कलाकार, साहित्यिक - १,८०० रु.
जिल्हा पातळीवरील कलाकार, साहित्यिक - १,५०० रु.
००००
कोट बॉक्स
पूर्वी समाजकल्याण विभागातर्फे मानधन दिले जात होते. आता राज्यस्तरावरून मानधन दिले जाते. परंतु दरमहा मानधन मिळत नसल्याने आर्थिक पेच निर्माण होतो. शासनाने दरमहा मानधन देऊन वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे. नोव्हेंबर महिन्यापासून मानधन थकीत आहे.
- शिवमंगलआप्पा राऊत, कारंजा
0000
कोट बॉक्स
मागील तीन महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. मानधन मिळेल, या भरवशावर किराणा व अन्य साहित्य हे दुकानामधून उधारीवर घेतले जाते. मानधन मिळाले नसल्याने उधारी कशी द्यावी, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. मानधन दर महिन्याला मिळावे.
- आभाताई पळसोकर, कारंजा
०००
कोट बॉक्स
८५ व्या वर्षातही समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहे. मात्र, मानधन मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. उदरनिर्वाहासाठी दुसरे साधन नसल्याने आणि माधन मिळाले नसल्याने जीवनावश्यक वस्तूंचे खरेदी कशी करावी, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
- वामन थोरात, आसेगाव पेन
००००
कोट बॉक्स
जिल्ह्यात ५९२ वृद्ध साहित्यिक व कलावंत आहेत. यामध्ये जिल्हास्तरावरील ५८७, राज्यस्तर ४ आणि राष्ट्रीय स्तरावरील एक अशा कलावंतांचा समावेश आहे. या कलावंतांना संचालक कार्यालयाकडून मानधन देण्यात येते.
- माया केदार,
प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी
जिल्हा परिषद वाशिम.