वाशिम : पोलीस प्रशासनाने वाशिम तालुक्यातील पंचाळा आणि कारंजा शहरातील गवळीपुरा भागात चालणाऱ्या अवैध गावठी दारू अड्ड्यांवर बुधवार, ३ मे रोजी धडक कारवाई केली. यात एकंदरित ३ लाख १३ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यासोबतच सहा आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.मिळालेल्या गुप्त माहितीवरून बुधवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या ग्राम पंचाळा शेतशिवारातील गावठी दारू ुअड्ड्यावर छापा टाकला. यावेळी मोहगव्हाण येथे वास्तव्यास असलेला रन्नू छोटू भवानीवाले, उस्मान हुसेन नंदावाले, नाजीर रशीद मंदारवाले, जमीर पिरू नंदावाले यांच्याकडून ४० टिन डब्बे ज्यामध्ये प्रत्येकी १५ लीटर व १८ टाक्या ज्यामध्ये प्रत्येकी २०० लीटर असा ४२०० लीटर सडवा मोहमाच (किंमत २ लाख ५२ हजार) तसेच इतर दारू गाळण्याचे साहित्य (किंमत ९ हजार ८००), असा २ लाख ६१ हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच कारंजा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कारंजा शहरातील गवळीपुरा येथील जमीर कालू रेघीवाले याच्याकडून ३७ हजार ५०० रुपयांचा सडवा मोहमाच व अफरोज इमाम रेघवाले याच्याकडून १४ हजार २०० रुपयांचा माल जप्त करुन संबंधित सहाही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.रिसोड तालुक्यातील मोहजाबंदी येथेही पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर धडक कारवाई करून तीन हजार रुपयांची दारू जप्त केली. यासह आरोपी बबन सीताराम काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गावठी दारू अड्ड्यांवर धाड; तीन लाखांचा माल जप्त
By admin | Published: May 04, 2017 1:22 AM