किसान अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती, पीक पाणी, पिकांवरील रोगराई, त्यासाठी नियोजन, आदी माहितीचे संदेश दिले जातात. ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या अॅपद्वारे दिले जाणारे संदेश दोन तीन दिवस उशिरा मिळत आहेत. त्यामुळे अॅप नावापुरतेच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वादळ गेल्यानंतर अलर्ट मिळाल्याचे समोर आले आहे.
किसान अॅपवर काय मिळते माहिती
अॅपवरून शेतकऱ्यांना कृषी हवामानविषयक माहिती मोबाईलवर पाठवून उपयुक्त सल्ले देण्यात येतात.
जिल्हा परिसरातील कृषी निविष्ठा व्यापारी, विक्री केंद्र याची माहिती देण्यात येते.
जिल्ह्यातील सर्व बाजार समितींचे बाजारभाव देण्यात येतात. त्यामुळे दर माहिती करणे सोयीस्कर होते. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत माहिती देण्यात येते.
अपडेट वेळेत मिळावे...
हवामान वातावरणात होणारे बदलाचे अपडेट वेळेत मिळावे त्यामुळे शेतीचे नियोजन करण्यात सोयीस्कर होईल.
बाजारभाव दररोज अपडेट झाल्यास माल विक्रीसाठी नेता येईल, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.
पीक संरक्षक सल्ला, वारंवार कीटकनाशके कळतील.
फायदा कमी, डोकेदुखी जास्त
हवामान बदलता सतर्कता महत्त्वाची आहे. वेळोवेळी वातावरणाचे संदेश मिळाल्यास पिकांची निगा राखण्यास फायदेशीर ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या अॅपच्या माध्यमातून माहिती अपडेट करण्यात येत नसल्याने अडचणी येत आहेत.
-----------
पूर्वी पोस्टातून येणारी तार, पत्र नोकरीचा कॉल हे तारीख निघून गेल्यावर मिळाल्याचे अनेकांना ऐकिवात आहे. त्यास किसान अॅपच्या संदेशामुळे उजाळा मिळत आहे. जूनपासून पावसाळा सुरू होत आहे. आगामी काळात तरी किसान अॅपवरून दिले जाणारे संदेश, सावधानतेचे इशारे हे किमान एक ते दोन दिवस अगोदर मिळावेत.
--------
किसान अॅपच्या माध्यमातून मिळणारे संदेश शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यावर शेती करताना चांगला उपयोग होतो. गेल्या काही दिवसांपासून येणारे संदेश उशिरा येत आहेत. त्यामुळे वरातीमागून घोडे असा प्रकार घडत आहे. पूर्वीप्रमाणे हे संदेश यावेत.