लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोविड केअर सेंटर म्हणून समाजकल्याण विभागांतर्गत येणारे शासकीय वसतिगृह, निवासी शाळा या जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे निवासी शाळा, वसतिगृहे सुरू होऊ शकली नाहीत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख घसरल्याने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. दुसरीकडे समाजकल्याण विभागांतर्गत येणारी शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे रिसोड, वाशिम, मंगरूळपीर यासह अन्य ठिकाणची शासकीय वसतिगृहे कोविड केअर सेंटर म्हणून प्रशासनाच्या ताब्यात आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात जवळपास ५० वसतिगृहे आहेत. परंतु, कोरोनामुळे या वसतिगृहातही इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी राहण्यासाठी आले नसल्याची माहिती आहे. आदिवासी विभागांतर्गत येणारे वसतिगृहेदेखील कोविड केअर सेंटर म्हणून प्रशासनाच्या ताब्यात आहेत.
निवासी शाळाही बंद समाजकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या निवासी शाळादेखील जिल्ह्यात सुरू झाल्या नाहीत. कोरोना परिस्थिती आणि वरिष्ठांच्या निर्देशानुसार वसतिगृह व निवासी शाळा सुरू करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.