वाशिम, दि. २६- येथील सुभाष चौकस्थित श्री संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिराच्या मागील बाजूस रहिवासी असलेले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवानवृत्त कर्मचारी मनोहर चंदन यांच्या घराला आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दल वेळेवर पोचल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत घरातील सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वाशिम शहराच्या मध्यभागी असलेल्या सुभाष चौकनजीक जैन मंदिराला लागून असलेल्या गल्लीत मनोहर चंदन यांची बिल्डींग आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने घरातुन प्रचंड प्रमाणात धुर निघू लागला. यामुळे घरमालक चंदन, पत्नी, मुलगा आदी सर्वजण घराबाहेर पडले. सामाजिक कार्यकर्ते अनंता रंगभाळ व धनंजय हेंद्रे, निलेश जैस्वाल यांनी त्वरित अग्निशामक दलाला निरोप दिल्यामुळे चालक दिनकर सुरुशे यांनी त्वरित घटनास्थळ गाठले व आग विझविण्यास सुरुवात केली. अध्र्या तासातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलास यश आले. अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी शेजारी शांतीलाल मालीया, प्रमोद पाटणी, प्रविण पाटणी, विष्णू डावर, रवणे, अमोल मुळे, विजय आलमकर,संजय माळोदे, अमित पाटणी, राजेश बदर,तसेच अग्निशामक दलाचे कैलास सुरोशे, रंजन सुर्वे, प्रशांत पाटणकर, निर्भय दिंडे, गजानन सुर्वे आदी कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी घरात घुसून दोन सिलेंडर व अन्य सामान घराबाहेर काढले. मात्र तोपर्यंत घरातील फ्रीज,टीव्हीसंच, सोफासेट, पलंग व घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घराला आग; जीवितहाणी टळली!
By admin | Published: September 27, 2016 2:22 AM