लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बिअर शॉपी बंद झाल्यानंतर रात्री घरी येऊन बिअर मागणाºयांना नकार दिला असता, त्याचा राग मनात धरून चौघांनी बिअर शॉपी मालकाचे घरच पेटवून दिले. त्यात ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना वाशिम तालुक्यातील काटा येथे २७ फेब्रूवारीच्या रात्री घडली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय सिंपणे यांनी १ मार्च रोजी दिलेल्या माहितीनुसार, काटा येथील शे. नूर शे. रहीम यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की ते त्यांची बिअर शॉपी बंद करून घरी गेले असता, गावातीलच राहूल घोडपादे, मंगेश बोरकर, अक्षय कंकणे आणि अविनाश नालिंदे यांनी घरी येऊन बिअरची बॉटल मागितली; मात्र घरी बिअर ठेवत नसल्याचे संबंधितांना सांगूनही त्यांनी शिविगाळ केली. दरम्यान, रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घराला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यात मोटारसायकल, सायकल, फ्रीज, ४० कोंबड्या यासह इतर ४ ते ५ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. आरोपींना बिअर न दिल्याच्या कारणावरूनच त्यांनी घराला आग लावून दिली, असे शे. नूर यांनी फिर्यादीत नमूद केले. त्यावरून पोलिसांनी चारही आरोपींवर भादंविचे कलम ४३६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. चारही आरोपींना २८ फेब्रूवारीच्या रात्री पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे ठाणेदार सिंपणे यांनी सांगितले.
बिअरची बॉटल न दिल्याच्या कारणावरून पेटवून दिले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 1:43 PM