सुनील काकडे
वाशिम : १४ वर्षाआतील मुलांना कुठल्याही उद्योग-व्यवसायात काम करण्यास मनाई करण्यासोबतच अशा मुलांना कामावर ठेवणे दखलपात्र गुन्हा आहे. दोषीला ६ महिने ते २ वर्षे तुरूंगवास अथवा २० ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असताना जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, धाब्यांवर बालकामगार कामे करित असताना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे गत वर्षभरापासून बालकामगार निष्पन्न करण्यासंबंधीचे धाडसत्रच राबविण्यात आले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.बालकामगारांसंदर्भातील जुन्या कायद्यानुसार ८३ प्रकारच्या व्यवसाय, उद्योगांमध्ये १४ वर्षाआतील मुलांकडून कामे करून घेण्यास बंदी होती. सुधारणा विधेयकात ही बंदी अधिक व्यापक करण्यात आली. त्यानुसार, १४ वर्षाआतील मुलांना कुठल्याही उद्योग-व्यवसायात काम करण्यास मनाई करण्यासोबतच अशा मुलांना कामावर ठेवणे दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला. असे असले तरी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त अल्पवयीन मुलांना घरच्या शेतीत किंवा उद्योगात काम करण्यास परवानगी देण्यात आली. नेमक्या याच कारणामुळे बालमजूर ओळखण्याकामी अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय कमी पैशात कामे करण्यासाठी कामगार मिळत असल्याने हॉटेल्स, धाबे, नाश्ताविक्रीच्या गाड्यांवर बालकांना जुंपले जात आहे. सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे; मात्र फेब्रूवारी २०२० या महिन्यापासून धाडसत्रच राबविण्यात आलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. चार विभाग एकत्र येऊन करतात कारवाईकुठल्याही उद्योग, व्यवसायात बालकामगार राबत असल्यास धाडसत्र राबविण्याकरिता चार विभागांना एकत्र यावे लागते. त्यात सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, महिला व बालकल्याण, शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाचा सहभाग असतो. गत वर्षभरापासून यासंदर्भातील एकही कार्यवाही झाली नसल्याची माहिती आहे. घरगुती उद्योग, हॉटेल्स अथवा इतर तत्सम उद्योगांमध्ये १४ वर्षाआतील मुले काम करताना आढळल्यास कार्यवाही केली जाते. त्यानुसार, मार्च महिन्यात धाडसत्र राबविण्याची बाब विचाराधिन आहे. कायद्यानुसार मालक आणि संबंधित मुलांमध्ये ‘ब्लड रिलेशन’ असल्याचे सिद्ध झाल्यास कार्यवाही करता येत नाही.- गौरव नालिंदेसरकारी कामगार अधिकारी, वाशिम