वाशिम शहरातही बुलेट वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. ही गाडी ठराविक वेगाने चालवली तर तिचा आवाज ठिकठाक असतो; परंतु सायलेन्सरच्या पुंगळ्या काढल्या की तोच आवाज कर्णकर्कश्य व नकोसा होतो. असे असताना काही लोकांनी हा प्रकार अवलंबिला आहे. दरम्यान, वाहनांच्या हॉर्नचे किंवा सायलेन्सरचे कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्यांना पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंडाची तरतूद नव्या निर्णयाद्वारे करण्यात आली आहे. त्याचा धसका घेऊन तरी किमान हा प्रकार बंद व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
.................
घाबरविणाऱ्या हॉर्नवर मिळविले नियंत्रण
वाशिममध्ये शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांत सातत्याने कारवाया करून घाबरविणाऱ्या हॉर्नवर नियंत्रण मिळविले आहे; मात्र काही बुलेटचालक सायलेन्सरचा कर्णकर्कश्य आवाज करत शहरात मोकाट फिरत आहेत. त्यांचाही बंदोबस्त करणे आवश्यक ठरत आहे. हे वाहनचालक शाळा किंवा दवाखान्यांसमोरून जातानाही भान राखत नसल्याने कठोर कारवाई करणे आवश्यक झाले आहे.
......................
कोट :
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून यापूर्वीच चाचपणी करण्यात आली आहे; मात्र वाशिम शहरात फटाक्यांसारखा आवाज करत धावणाऱ्या बुलेट सध्यातरी नाहीत. वाहनांच्या कर्णकर्कश्य हॉर्नवरही बहुतांशी नियंत्रण मिळविण्यात आले आहे. वाहनचालकांनी इतरांना त्रास होईल, असे वर्तन कदापि करू नये.
- नागेश मोहोड
शहर वाहतूक निरीक्षक, वाशिम
..........
वर्षभरात ७० जणांवर पोलिसांकडून कारवाई
वाहनांना कर्णकर्कश्य हॉर्न बसवून ते गावभर वाजवत फिरणाऱ्या ७०पेक्षा अधिक वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ठराविक दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कायमचा बंद करण्याबाबत समजदेखील देण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक निरीक्षक नागेश मोहोड यांनी दिली.
..............
काय कारवाई होऊ शकते?
वाहनांच्या मूळ रचनेत प्रशासनाच्या परवानगीशिवाय बदल करणे ही बाबच चुकीची आहे. असे असताना अनेकजण त्यात मन मानेल त्यापद्धतीने बदल करतात. त्यात कर्णकर्कश्य हॉर्नचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.