मंगरुळपीर आगारकडून मंगरुळपीर-बोरव्हा ही बसफेरी दीड वर्षांपूर्वी मार्गाचे नूतनीकरण सुरू झाल्यानंतर बंद करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील जनुना, चेहेल, लावणा, धानोरा, कोठारी, कवठळ, बोरव्हासह १२ गावातील विद्यार्थी व प्रवाशांना अडचणी येऊ लागल्या होत्या. जवळपास ३४ हजार ग्रामस्थांना बसफेरीअभावी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. त्याचा फायदा खासगी वाहनचालक घेऊन वाहनात प्रवाशांना गुराप्रमाणे कोंबून भरत. यातून एखादवेळी अपघात घडण्याची भीती होती. शिवाय बसअभावी माध्यमिक शाळातील विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम होऊ लागला होता. लोकमतने वारंवार यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले, तर ग्रामस्थांनीही बसची मागणी लावून धरली. त्यामुळे अखेर २१ जानेवारीपासून या मार्गावर मानव मिशनची बस सुरू करण्यात आली. ही बसफेरी सकाळी ८ वाजता मंगरुळपीर येथून निघून ८.४० वाजता बोरव्हा येथे पोहचली, तर ९ वाजता बोरव्हा येथून परत निघून कवठळ, कोठारी चेहेल मार्गे १० वाजता मंगरुळपीर येथे परतली.
मंगरुळपीर-बोरव्हा मार्गावर मानव मिशनची बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:36 AM