वाशिम - मानवी अवयव प्रत्यारोपणासंदर्भात आरोग्य विभाग व स्वयंसेवी संघटनेच्यावतीने जनजागृती केली जात आहे. मृत्यूनंतरही जग पाहा, असे नेत्रदानाबाबत म्हटले जाते. आता नेत्रदानाबरोबरच इतर अवयवही दान करा आणि दुसºयांना जीवनदान द्या, असा नारा दिला जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता मरणोत्तर अवयव दानाच्या संख्येत वाढ होत असल्याचे आशादायी चित्र आहे.
जन्माला आलेल्या मानवाला मृत्यु हा अटळ आहे. धकाधकीच्या युगात मानवाला विविध आजार जडत आहेत. शरिरातील एखादा अवयव निकामी झाला तर दुसºया अवयवाशिवाय पर्याय नसतो. दुसरा अवयवही मानवाकडूनच मिळणे गरजेचे आहे. यातूनच ‘अवयव दान’ या संकल्पनेचा जन्म झाला. मृत्यूनंतर साधारणत: ४८ तास मानवी अवयव जीवंत राहु शकतात. या ४८ तासात नेत्र, मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस मृतक मनुष्याच्या शरीरातून काढण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. हेच अवयव गरजू व्यक्तींना जीवनदायी ठरतात. मृत्यूनंतरही शरिरातील अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतात, याबाबत सेवाभावी संस्था आणि आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी साधारणत: नेत्रदान करण्यावरच भर दिला जायचा. आता नेत्राबरोबरच मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस यासह महत्त्वाचे अवयव दान करण्याबाबतच्या जनजागृतीवर भर दिला जात आहे. अवयव दान मोहिमेत ‘व्यावसायिकता’ शिरू नये म्हणून केंद्र शासनाने १९९४ मध्ये एक अधिनियम पारीत केला आहे. मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री होऊ नये याकरिता केंद्र शासनाने ‘मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम, १९९४’ लागू केला आहे. राज्यात १८८ नोंदणीकृत केंद्रे असून, त्यापैकी एक अवयव प्रत्यारोपणासाठी १५३ व एकापेक्षा जास्त अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी ३५ केंद्रे आहेत. नेत्रदान, नेत्रपेढी व बुब्बुळ प्रत्यारोपणासाठी २७८ केंद्रे आहेत. राज्यात मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, नेत्रपटल आदी अवयवांच्या यशस्वी प्रत्यारोपणातून अनेकांना जीवनदान मिळाले आहे. राज्यातील मृत्रपिंड प्रत्यारोपणाची आकडेवारी विचारात घेतली तर २०१५-१६ मध्ये ९७, २०१६-१७ मध्ये २०४ आणि २०१७-१८ मध्ये २३० मृत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. यकृत प्रत्यारोपणाच्या आकडेवारीनुसार, २०१५-१६ मध्ये ४१, २०१६-१७ मध्ये ११७ आणि २०१७-१८ मध्ये १३४ यकृतांचे प्रत्यारोपण झाले. २०१५-१६ मध्ये ५ हृदय प्रत्यारोपण, २०१६-१७ मध्ये ३५ आणि २०१७-१८ मध्ये ५७ हृदय प्रत्यारोपण झाले. सर्वाधिक प्रत्यारोपण नेत्रपटल या अवयवाचे आहे. २०१५-१६ मध्ये ३२३०, २०१६-१७ मध्ये २९८९ आणि २०१७-१८ मध्ये ३२०० नेत्रपटलाचे प्रत्यारोपण झाले.
मानवी अवयव दानासंदर्भात आरोग्य विभाग व स्वयंसेवी संघटनेच्यावतीने जनजागृती केली जात आहे. याचे सकारात्मक परिणाम म्हणून अवयव दान केले जात आहे. यामुळे गरजूंना जीवनदान मिळत आहे.- डॉ. अनिल कावरखे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रूग्णालय, वाशिम.