शिरपूर जैन: येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानच्यावतीने २९ मार्च रोजी गावातून शोभायात्रा काढून भगवान महाविर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या शोभायात्रेत वाशिम जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील भाविकांनी यामध्ये सहभाग घेतला. जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच भाविकांना महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले.
शिरपूर जैन ही जैन बांधवांची काशी म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात भगवान महाविर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. यंदाही येथ्ील दिगंबर जैन संस्थानच्यावतीने जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे भगवान महाविर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातून भगवान महाविरांच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. मालेगाव, रिसोड, हराळ, कारंजा, वाशिम, मेहकरसह शिरपूर येथील शेक डो जैन बांधवांनी यात सहभाग घेतला. ही शोभायात्रा गावातील मुख्य मार्गांनी फिरवित पवळी मंदिरात नेण्यात आली. या ठिकाणी पालखीचे स्वागत व पुजन करण्यात आले. त्यानंतर भगवान महाविर यांचा पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी २ वाजता दिगंबर जैन संस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष कारंजा येथील शिरीषभाऊ चवरे यांच्यावतीने आयोजित महाप्रसादाचे वितरण भाविकांना करण्यात आले. पुढे भक्ती संगीत कार्यक्रम झाला. त्यानंतर पंडित दिलिप महाजन यांच्या प्रवचनाने महाविर जन्मोत्सवाचा समारोप करण्यात आला.