लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून जात असलेल्या चार राष्टÑीय महामार्गांची तद्वतच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गंत रस्त्यांची कामे सुरू असून त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नैसर्गिकरित्या वाढलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.वाशिम जिल्ह्यात वाशिम ते कारंजा, मालेगाव ते रिसोड, शेलुबाजार ते मानोरा, कारंजा ते मानोरा अशा चार राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. यासोबतच शासनाच्या विविध योजनांमधून इतरही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. यादरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली दुतर्फा ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून उभी असलेली कडूलिंब, बाभूळ, बिहाडा, काटसावर, चिमन-साग, सालई अशी सर्वच प्रकारची झाडे तोडण्यात येत आहेत. परिणामी, रस्ते विकास तर होत आहे; परंतु सोबतच पर्यावरणाची देखील मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक वनिकरण विभागाने गत काही वर्षांत रस्त्याच्या दुतर्फा लावलेली आणि योग्य संगोपनामुळे बऱ्यापैकी वाढलेली झाडेही यातून सुटलेली नाहीत. यामुळे कधीकाळी हिरव्याकंच झाडांनी व्यापलेली रस्ते आता मात्र पूर्णत: बोडखी दिसत असून वृक्षप्रेमींमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे. वनविभागामार्फत काढले जाते वृक्षांचे ‘व्हॅल्यूएशन’रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडल्या जाणाºया वृक्षांचे ‘व्हॅल्यूएशन’ काढण्याचे काम वनविभागामार्फत होत असून संबंधित कंत्राटदाराने सदर रक्कम शासनखात्यात जमा केल्यानंतर तोडल्या जाणारे झाड त्याच्या मालकीचे होते. या पद्धतीने आतापर्यंत शेकडो वृक्षांची तोड झाली असून त्याची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रस्ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकारामुळे गंभीर स्थिती उद्भवण्याचे संकेत आहेत. यामुळे विकास नव्हे; तर भकासपणा वाढत चालला असून प्राणवायूअभावी फुफ्फुसाच्या आजारांचे प्रस्थ वाढणार आहे. माणसाचे अस्त्विच जर यामुळे धोक्यात येत असेल तर कशाला हवा अशा प्रकारचा विकास.- माधवराव मारशेटवार, वृक्षमित्र, वाशिमशासनस्तरावरून एकीकडे वृक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून वृक्षलागवड योजना राबविण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र नैसर्गिकरित्या वाढलेल्या वृक्षांची रस्ते विकासाच्या गोंडस नावाखाली कत्तल केली जात आहे. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा.- नीलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ, कारंजा