भर जहागिर : संसाराच्या वेलीवर फुललेल्या दोन फुलांसोबत संसाराचा गाडा सुरळीत चाललेला असतानाच पतीची साथ अर्ध्यावर सुटली; पण अशाही स्थितीत स्वत:ला सावरत कुंताताईंनी हिंमत नाही तुटू दिली. पती अचानक जग सोडून गेल्यानंतर त्यांनी बाळगलेले स्वप्न कुंताताईंनी प्रत्यक्षात उतरवत दोन्ही मुलांना एमबीबीएसचे शिक्षण मिळवून दिले. कुंताताईंचा हा जीवनप्रवास समाजातील अन्य महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरावा असाच आहे.
भर जहागिर येथील परशराम गरकळ यांचा विवाह कुंताताई यांच्याशी १९९३ मध्ये झाला. १९९५ मध्ये हे कुटुंब व्यवसायानिमित्त नजिकच्या बोरखेडी येथे स्थायिक झाले. कालांतराने त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. दोन्ही मुले अभ्यासात हुशार असल्याने त्यांची जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथे २००७ व २०१२ मध्ये निवड झाली. अशात डॉ. गरकळ यांचे निधन झाले. त्यामुळे कुंताताईंवर आभाळ कोसळण्यासोबतच मुलांना डॉक्टर बनविण्याचे पतीने बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारीही ओढवली. मुलांनीही आई-वडिलांच्या अपेक्षांना सार्थ ठरविले. मुलगा आकाश याची २०१५ मध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी वर्णी लागली. आकाश हे शिक्षण घेत असतानाच मुलगी पल्लवीनेही २०२० मध्ये परीक्षा उत्तीर्ण करत एमबीबीएसच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. यामुळे डॉ. परशराम गरकळ यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे. वडिलांची साथ लहानपणीच सुटली; पण आमची आईच दोन्ही भूमिकांमधून प्रेरणा देत राहिल्यानेच यश गाठणे शक्य झाल्याचे आकाश व पल्लवी गरकळ या बहीण-भावांनी सांगितले.