वाशिम: अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावरुन धावत असलेल्या हैदराबाद-जयपूर-हैदराबाद विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने २९ जानेवारीला घेतला. त्यानुसार ही विशेष रेल्वे आता मार्चअखेरपर्यंत धावणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील जनसंपर्क कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार जानेवारीअखेरपर्यंत प्रस्तावित असलेली गाडी क्रमांक ०७११५ हैदराबाद-जयपूर साप्ताहिक एक्स्प्रेसला २ फेब्रुवारी ते २९ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. ही रेल्वे प्रस्थान स्थानकावरुन दर शुक्रवारी रात्री २० वाजून २० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ४:०४ वाजता वाशिम स्थानकावरुन पोहचून अकोला मार्गे जयपूर येथे सायंकाळी १७:२५ वाजता पोहचेल. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७११६ जयपूर-हैदराबाद एक्स्प्रेसला ४ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ही गाडी जयपूर येथून दर रविवारी दुपारी १५:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी वाशिम स्थानकावर दुपारी १६:१४ वाजता पोहचून हैदराबाद येथे सकाळी ३ वाजता पोहचेल. ही गाडी निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा मार्गे धावणार आहे. त्यामुळे या मार्गाने विविध ठिकाणी रेल्वे प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.