शिरपूर जैन: देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यात हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी) करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुरू झाली असून, या मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी संबंधित संस्थेला सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत.
देशातील गाळयुक्त खोऱ्यात हायड्रोकार्बनचे साठे असल्याची शक्यता तपासण्यासाठी सेस्मिक डेटा संकलित करण्याचे काम ओएनजीसीकडे सोपविण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे काम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित सेवा पुरवठादाराच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहे. या साठी अल्फा जीओ इंडिया या संस्थेच्यावतीने वाशिम जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यासाठी राज्याच्या महसूल व वनविभाग मंत्रालयाकडे सहकार्य करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सुचित करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वच तहसीलदारांना पत्र पाठवून महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना संबंधित संस्थेला त्यांनी निश्चित केलेल्या जागेवर सर्वेक्षण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सुचना देण्याचे निर्देश दिले होते. आता या प्रक्रियेला मालेगाव तालुक्यात प्रारंभ झाला आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील इतरही तालुक्यात ही मोहिम सुरू होण्याची शक्यता असून, हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात हायड्रोकार्बनच्या साठ्याबाबत निश्चित माहिती मिळू शकणार आहे.