लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड (वाशिम): येथील शेतकरी खुशाल गावंडे यांनी रब्बीच्या हंगामात हरभरा किंवा गहू पिकाची पेरणी करून जोखीम पत्करण्यापेक्षा रब्बी तुरीचा आधार घेतला आहे. दोन एकरात पेरलेली रब्बीची तूर योग्य नियोजनामुळे चांगलीच बहरली असून, या पिकातून १५ क्विंटल उत्पन्न होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील शेतकरी खुशाल गावंडे हे आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करून फेरपालट पद्धतीच्या आधारे भरघोस उत्पादन घेतात. त्यांनी यापूर्वी, गहू, हरभरा, सोयाबीन, उडिद, मुग आणि ज्वारी या पिकांच्या आधारे मोठ्या प्रमाणात उत्पादनही घेतले आहे. त्यांनी मागील वर्षांपासून एक वेगळा प्रयत्न करताना रब्बीच्या तुरीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी त्यांनी अवघ्या २० गुंठे क्षेत्रात रब्बीची तूर पेरली आणि त्यामधून तब्बल ३.७५ क्विंटलचे उत्पादन घेतले. यंदा त्यांनी सोयाबीन आणि उडिद,मुगाची काढणी झाल्यानंतर एकूण शेतापैकी दोन एकर क्षेत्रावर रब्बीची तूर पेरली आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे गहू पिकाला पाणी देणे शक्य होणार नाही, तर कमी थंडीमुळे हरभरा पिकातून फारसे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा नसल्याने त्यांनी हा प्रयोग केला आहे. हरभरा आणि गहू या दोन्ही पिकापेक्षा रब्बीच्या तुरीला कमी खर्च लागतो. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी रब्बीची तूर पेरली आहे. तीन फुट अंतरावर ओळीने पेरणी करून तुषार सिंचनाद्वारे तुरीला पाणी दिले. खत आणि किटकनाशकांचा प्रभावी वापर करून त्यांनी ही तुर वाढविली आहे. सद्यस्थितीत ही तूर तीन फुट उंच वाढली असून, या पिकातून किमान १५ क्विंटल उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे
आदर्श शेती : पार्डीच्या शेतकऱ्याने घेतला रब्बी तुरीचा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 4:22 PM
पार्डी ताड येथील खुशाल गावंडे या शेतकऱ्याने रब्बीच्या हंगामात हरभरा किंवा गहू पिकाची पेरणी करून जोखीम पत्करण्यापेक्षा रब्बी तुरीचा आधार घेतला आहे. दोन एकरात पेरलेली रब्बीची तूर योग्य नियोजनामुळे चांगलीच बहरली आहे.
ठळक मुद्देयोग्य नियोजनामुळे बहरले तुरीचे पीक