गोरगरीब रुग्णांना मोफत तसेच अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. येथे उपचार व औषधे मोफत पुरविण्यात येतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधे उपलब्ध करून दिली जातात की वैद्यकीय अधिकारी ती बाहेरून आणण्यास सांगतात, चिठ्ठीवर लिहून देतात यासंदर्भात बुधवारी रिॲलिटी चेक केले असता, चिठ्ठीवर औषधे लिहून देत नसल्याचे दिसून आले. बाहेरून औषधे आणण्यास मनाई असून, कुणी बाहेरून औषधे आणण्यास सांगितले किंवा चिठ्ठीवर लिहून दिले तर कायदेशीर कारवाई केली जाते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
००
जिल्हा सामान्य रुग्णालयात बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात नाही किंवा वैद्यकीय अधिकारी चिठ्ठीवर लिहून देत नाहीत. कुणी अधिकारी हे बाहेरून औषधे आणण्यास सांगत असेल तर संबंधितांविरूद्ध कारवाई करू.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक
०००
स्वच्छेने औषधे आणण्यास मुभा
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध औषधे संबंधित रुग्णांना दिली जातात. याउपर कुणाला महागडी औषधे स्वेच्छेने विकत आणायची असेल तर तशी मुभा दिली जाते. ‘स्वेच्छेने’ या नावाखाली बाहेरील औषधे जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊ शकतात.