लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये एकंदरित २५२ गावांमध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या जलयुक्त शिवारच्या २५८६ कामांपैकी २२५० कामे पूर्ण झाली; तर उर्वरित ३३६ कामे प्रलंबित आहेत. शिल्लक असलेल्या ६ कोटींच्या निधीतून ती पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाने मुख्य सचिवांची परवानगी मागितली; मात्र ती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. अशात जलयुक्त शिवारचा शिल्लक निधी खर्च न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास संबंधित सर्व कामे प्रभावित होणार असल्याचे संकेत आहेत.२०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात ४१२, रिसोडमध्ये ४०५, मालेगावात ५७०, मंगरूळपीरपिरात ४०८, मानोरा १३० आणि कारंजा तालुक्यात ३२५ अशी एकूण २२५० कामे पूर्ण झाली आहेत. त्याची टक्केवारी ९२.९ आहे. या कामांवर २५ कोटींपेक्षा अधिक निधी खर्च झाला असून ६ कोटींचा निधी शिल्लक आहे. त्यातून प्रलंबित असलेली ३३६ कामे पूर्ण होऊ शकतात; मात्र नव्या वर्षात मुख्य सचिवांची अद्यापपर्यंत परवानगी मिळाली नसून राज्यशासनाने जलयुक्तचा सर्व निधी थांबविल्याची माहिती आहे. असे झाल्यास कामे प्रभावित होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. जलयुक्त शिवारच्या प्रलंबित असलेल्या ३३६ कामांसाठी ६ कोटींचा निधी शिल्लक आहे; मात्र तो खर्च करण्यासंबंधी मुख्य सचिवांची परवानगी अद्याप मिळालेली नाही. राज्यशासनाकडून निधी थांबविल्यासंदर्भात कुठलेही निर्देश प्राप्त नाहीत.- एस.एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव, जलयुक्त शिवार अभियान, वाशिम
‘जलयुक्त’चा निधी थांबल्यास ३३६ कामे होणार प्रभावित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 3:00 PM