वाशिम : गतवर्षीच्या पीक नुकसानाची भरपाई म्हणून राष्ट्रीय पीक विमा योजनेतून शेतकर्यांना ५८ कोटी रुपये मिळाले आहेत. पीक विमा भरपाईची रक्कम थेट शेतकर्याच्या खात्यामध्ये जमा होणार असून, बँकांनी त्यामधून कर्ज वसुली केल्यास संबंधित बँक प्रशासनाविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड दम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बँक प्रशासनाला दिला आहे. पीक-परिस्थितीबाबत जिल्हाधिकार्यांनी १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर माहिती दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे प्रा. भरत गीते उपस्थित होते. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असताना पावसात खंड पडल्याने उगवण झालेली पिके संकटात सापडली आहेत. येत्या पाच ते सहा दिवसात पाऊस झाल्यास या पिकांवरील संकट दूर होईल. तरीही जिल्ह्यात दुबार पेरणीची वेळ आल्यास जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये पुरेसा बी-बियाणे साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिली. वेळेत पाऊस न आल्यास दुबार पेरणीची वेळ आल्यास आपत्कालीन परिस्थितीमध्ये ३१ जुलै २0१५ पेरणी करता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये २९ हजार ६३५ क्विंटल सोयाबीनचे बियाणे, ७२४ क्विंटल तूर बियाणे उपलब्ध आहे. तसेच सुधारित ज्वारीच्या वाणाचे २00 क्विंटल बियाणे महाबीजकडे उपलब्ध असून सुधारित बाजरीचे ८ क्विंटल व मका १२ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, याचा वापर आपत्कालीन स्थितीत शेतकर्यांना पेरणीसाठी करता येईल. तसेच ज्या शेतकर्यांकडे घरगुती बियाणे उपलब्ध आहे, त्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. सद्यपरिस्थितीमध्ये जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी शेतकर्यांनी पिकांमध्ये आंतर मशागतीला प्राधान्य द्यावे. त्यासाठी रोपांची विरळणी, कोळपणी, डवरणी करून पिकास मातीची भर द्यावी. पाण्याची उपलब्धता असल्यास तुषार सिंचनाद्वारे पाणी देणे, नुसत्या पाण्याची किंवा ५ टक्के कंपोस्ट खताचा अर्क किंवा ५ टक्के गांडूळ खताचा अर्क किंवा १ टक्के युरिया मि२िँं१्रूँं१त पाण्याची फवारणी केल्यास पीक जास्त काळ तग धरू शकेल. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकर्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, शेतकर्यांनी धीर धरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
पीकविम्याची रक्कम कपात केल्यास गुन्हे दाखल करू
By admin | Published: July 14, 2015 2:14 AM