वाशिम : अलीकडच्या काळात गल्लीबोळातील दोस्ताना जरा जास्तच बहरल्याचे आणि त्यातून चुकीच्या पद्धतीला खतपाणी घालण्याची परंपरा रूढ होत आहे. शहरांतील मुख्य रस्त्यांवर चाैकात रात्रीच्या सुमारास वाढदिवसाला केक कापण्याचे कार्यक्रम साजरे होऊ लागले आहेत, पण सावधान... हुल्लडबाजी करीत रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे अंगलट येऊ शकते. एखादे वेळी केकऐवजी जेलची हवाही खावी लागू शकते, ही बाब आता पोलिसांनी गांभीर्याने घेतलेली आहे.
वाशिमसह जिल्ह्यातील इतरही ठिकाणी गल्लीबोळांत राहणाऱ्या दादांचा वाढदिवस म्हणजे, त्याच्या दोस्तांसाठी पर्वणीच ठरत आहे. त्यातूनच विशेषत: रात्रीच्या सुमारास शांतता भंग करून वाढदिवस साजरा करण्याची हौस भागविण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, यापुढे अशा वाढदिवसांचे कार्यक्रम साजरे करणे महागात पडू शकते. पोलिसांच्या निदर्शनास आल्यास जेलची हवा खावी लागू शकते.
...................
...तर गुन्हा दाखल
रस्त्यावर वाहन उभे करून केक कापणे
तलवारीने केक कापणे
डीजेवर मोठ्या आवाजात गाणी लावून रस्त्यावर गोंधळ घालणे
रात्रीच्या वेळी फटाके फोडून शांतताभंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येतो. रात्रीच्या वेळी गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात येते.
............
रस्त्यावर धिंगाणा नकोच
वाशिम शहरात शहर व ग्रामीण पोलीस ठाणे वसलेले आहे. १६ सप्टेंबरपासून ११२ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित झाला असून, पोलिसांकडून रात्रगस्तही वाढविण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष अथवा पोलीस ठाण्यात कोणी कॉल करून, तक्रार केल्यास पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचू शकतात. त्यामुळे उत्साहाच्या भरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे महागात पडू शकते.
...............
कोट :
वाढदिवस हा कुटुंबातील सदस्यांसमवेत घराच्या आतच साजरा करायला हवा. अलीकडच्या काळात मात्र रस्त्यावर, तेही रात्रीला शांतता भंग करून, वाढदिवस साजरे केले जात आहेत. त्यातून एखादे वेळी अनुचित प्रकार घडू शकतात. कायद्याने हा गुन्हा असून, कुणीही नियमभंग करून किंवा गर्दी जमवून रस्त्यावर वाढदिवस साजरा करू नये. असा प्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
- वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम.