वाशिम : कोट्यवधी रुपयांच्या खताची अवैधरित्या साठेबाजी करण्याच्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले विजय ऊर्फ महिंद्रा दागडिया व कोरोमंडल खत कंपनीचे उप व्यवस्थापक देवेंद्र मिश्रा यांचा अटकेसाठी आता पोलीसांवर दबाब वाढला. सदर प्रकरणी पोलीस उपमहानिरिक्षक बिपिन बिहारी यांनी तपास करणार्या पोलीसांना तात्काळ आरोपी शोधण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, पोलीसांनी शोधमोहीम तिव्र केल्याची माहीती सुत्रांनी दिली. शहरातील व्यापारी विजय उर्फ महिंद्रा भगवानदास दागडिया यांनी काटा मार्गावर तथा पंचाळा फाट्यावर एक गोदाम उभारले आहेत. १५ मे रोजी कृषी अधिकार्यांनी या गोदामावर टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या खतसाठा करण्यात आल्याचे आढळून आले. सदर प्रकरण पोलीसात पोहोचून दागडीया व मिश्रा या दोघांवर वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी गेले होते. मात्र, महिंद्रा दागडीया यांना आपण अटक होणार असल्याची कुणकुण लागल्याने ते फरार झाले. दागडीया व मिश्रा यांनी वाशिम जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायाधिशांनी प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन दोघांचाही जामीन अर्ज ३0 मे रोजी फेटाळून लावला. पोलीस उपमहानिरिक्षकांनी या प्रकरणाची स्वत: दखल घेऊन पोलिस अधिक्षक तुषार पाटील यांना दागडीया व मिश्रा यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
खतसाठा प्रकरण आयजींच्या दरबारात
By admin | Published: June 02, 2014 1:09 AM