लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील रिसोड येथे नारायणा सोशलाईज आणि स्पोर्टिंग क्लबमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा टाकून एकंदरित २ लाख ७ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ताब्यात घेतलेले १२ जण व क्लबच्या परवानाधारकाविरूद्ध कलम १२ जुगार अॅक्टसह कलम ३३ आर/डब्ल्यू १३१ म.पो.का. अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.रिसोड येथील नारायणा सोशलाईज आणि स्पोर्टिंग क्लबमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्यासह दिनकर मोरे, कैलास इंगळे, भगवान गावंडे, प्रशांत राजगुरू, सुनील पवार, प्रेम राठोड, बालाजी बर्वे, अश्विन जाधव आदिंचा समावेश असलेल्या पथकाने नमूद ठिकाणी १० ते ११ सप्टेंबरच्या रात्री २ वाजताच्या सुमारास छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील सुधाकर देशमुख (कवठा) जगदीश मुंदडा (सेनगाव), संजय पायघन (जयपूर), पंडित ढाकणे (सेनगाव), भास्करराव देशमुख (कवठा), राजू बेंगाळ (कोळसा), समंदर खाँ दौलत खाँ (सेनगाव), प्रल्हाद रावसाहेब (जयपूर), नामदेव उबाळे (भानखेडा), कैलास खाडे (सेनगाव) यांच्यासह मेहकर येथील कैलास सोनुने आणि रिसोड येथील गोपाळ मगर अशा १२ लोकांना जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आली. संबंधितांकडून १ लाख १४ हजार ८८० रुपये, डावावर लागलेले ९ हजार ३०० रुपये यासह अन्य साहित्य असा एकूण २ लाख ७ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नारायणा सोशलाईज आणि स्पोर्टिंग क्लबचा परवाना अर्चना संतोष चोपडे यांच्या नावे असून त्या घटनास्थळी आढळून आल्या नाहीत. मात्र, परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यासह अन्य १२ आरोपींविरूद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
अवैध जुगार अड्डयावर छापा; २ लाखांवर मुद्देमाल जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 4:20 PM