लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील साखरा शेतशिवारात सुरू असलेल्या पाझर तलावाच्या कामादरम्यान कुठलीच पूर्वसूचना न देता भूसंपादन करण्यात आले. ही बाब लक्षात घेऊन बुडित क्षेत्रात गेलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा, अशी मागणी पीडित शेतकऱ्याने लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.यासंदर्भात शेतकरी लक्ष्मण कान्हूजी महाले (रा.जांभरूण महाली) यांनी बुधवार, १ जून रोजी लघुपाटबंधारे विभागाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की साखरा शेतशिवारात गट नं. १६८, १६९, १२४ मधील ०.४० गुंठे जमीन पाझर तलावाकरिता संपादित करण्यात आली. त्यासाठी कुठलीच पूर्वसूचना देण्यात आली नाही. प्रत्यक्ष क्षेत्राची मोजणी न करता अवैधरीत्या संपादित करून पाझर तलावाचे काम सुरू आहे. आपल्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन तोंडी पद्धतीने तुम्हाला मोबदला देऊ, असे आश्वासन देऊन फसवणूक करण्यात आली. जमीन संपादनाची प्रक्रिया नियमानुसार न करता, मोजणी शिट न देता, लेखी माहिती न देता केली आहे. तथापि, सदर पाझर तलावात आपली किती जमीन संपादित होत आहे व मोजणी शिट, प्रतिहेक्टर मावजा रक्कम, मोबदला रक्कम किती, याबाबत लेखी माहिती कळवावी. जमिनीची शासकीय नियमानुसार खरेदी करून मोबदला रक्कम मिळाल्यानंतरच काम सुरू करावे; अन्यथा आत्महत्येशिवाय आपल्यासमोर पर्याय राहणार नाही, असे लक्ष्मण महाले यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आल्या.
तलावासाठी अवैधरीत्या भूसंपादन
By admin | Published: June 02, 2017 1:15 AM