लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारा मुरूम अवैधरित्या उत्खनन केल्याप्रकरणी आरएनएस इन्फ्रास्ट्रक्चर लि. हुबळी, कर्नाटक या कंत्राटदार कंपनीला १४ कोटी १५ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा दंड मानोरा तहसिलदारांनी ठोठावला. दंडाची रक्कम भरण्यासंदर्भात संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी २० जून रोजी दिली.
अकोला- आर्णी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए चे रुंदीकरण आणि सुधारणा काम सुरू आहे. यापैकी आर्णी ते हातना पर्यंतचे कंत्राट आरएनएस इन्फ्रास्ट्रक्चर लि. हुबळी, कर्नाटक या कंपनीला देण्यात आले. या कंत्राटदार कंपनीने बांधकामासाठी लागणारा मुरुम आॅक्टोबर २०१९ पासून विनापरवाना उचलत असल्याची तक्रार वाई गौळ येथील अॅड. श्रीकृष्ण राठोड, किशोर राठोड, महेश जाधव आणि फूलचंद राठोड यांनी तालुका व जिल्हा स्तरावर केली होती. तालुक्यातील सावळी येथील गट क्र.१३ मधील खाजगी मालकीच्या शेतजमिनीमधून २४६१९ ब्रास एवढ्या मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैध उत्खनन आॅक्टोबर २०१९ ते १७ मार्च २०२० पर्यंत केले. दरम्यान १८ फेब्रुवारी २०२० ते १७ मार्च २०२० एवढ्या कालावधीत गट क्र.१३ मधील एकून क्षेत्रापैकी केवळ १.५१ हे. आर. मालमत्ता असलेल्या राजनंदिनी ढाले यांच्या जमिनीवर २५०० ब्रास मुरुम उत्खनन करुन वाहतुक करण्याचा परवाना अप्पर जिल्हाधिकारी, वाशिम यांनी प्रदान केला होता. परंतु कंपनीने त्याच गटातील २.६९ हे. आर. क्षेत्रावर विनापरवाना २२११९ ब्रास मुरुमाचे उत्खनन केले. या अवैध कामाकरिता बाजारभावाच्या पाचपट दंड आकारण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये करण्यात आलेली आहे. त्याआधारे तहसीलदार, मानोरा यांनी तसा आदेश पारित केला असून दंडाची रक्कम ३ दिवसाच्या आत शासन जमा करण्याचे आदेश दिले. मंडळ अधिकारी, उमरी बु. आणि तलाठी, सावळी यांनी दंडाचा आदेश १२ जून रोजी मिळाला. परंतु अद्यापपर्यंत ही रक्कम शासन जमा झालेली नाही. त्यामुळे दंडाची रक्कम तातडीने भरावी, यासंदर्भात संंबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे, असे तहसिलदार डॉ. चव्हाण यांनी सांगितले.