अनसिंग (जि. वाशिम): सोयाबीन शेतकर्यांच्या घरात येत नाही तोच व्यापार्यांनी खरेदीचा अवैध व्यवसाय थाटून शेतकर्यांची लूट चालविल्याचा प्रकार अनसिंग येथे समोर आला आहे. या अवैध व्यवसायाची खुद्द हमाल-मापार्यांनी अनसिंग उपबाजार समितीच्या प्रशासनाकडे शनिवारी तक्रार केली. वाशिम तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून अनसिंग उपबाजार ओळखला जातो. शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच माल विकताना कुठल्याही प्रकारची फसवेगिरी शेतकर्यांसोबत होऊ नये याकरिता अनसिंग येथे २0 वर्षांपूर्वी उपबाजार समितीची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी वाशिम, यवतमाळ, हिंगोली जिल्हय़ातील बहुतांश शेतकरी आपला शेतमाल विक्रीस आणतात. अनसिंग उपबाजारात शेतमालाला बर्यापैकी भाव मिळतात. आतापर्यंत या उपबाजारात मोठय़ा संख्येने शेतकरी शेतमाला विक्रीला आणत. यावर्षी मात्र सुरुवातीलाच शेतकर्यांना गाठून जादा भाव देण्याच्या नावाखाली काही जणांनी खरेदीचा अवैध व्यवसाय थाटला आहे. सोयाबीनला बाजार समितीपेक्षा थोडाफार जास्त भाव द्यायचा आणि वजनमापात फसवणूक करायची, असा गोरखधंदा अनेकांनी चालविला असल्याने शेतकर्यांची फसवणूक होत आहे. या प्रकाराबाबत हमाल-मापार्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली आहे. अवैध व्यावसायिक सोयाबीन खरेदी करीत असल्याने हमाल-मापार्यांच्या व्यवसायावरदेखील विपरीत परिणाम होत आहे.वजनमापात फसवणूक झाल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी केल्या आहेत. शेतमाला खरेदीचा व्यवसाय थाटण्यापूर्वी संबंधित व्यापार्यांना बाजार समितीकडून परवाना घेणे आवश्यक आहे; मात्र कोणताही परवाना न घेता अनेक व्यापार्यांनी खरेदीचा व्यवसाय सुरू केल्याने शेतकर्यांची फसगत होत आहे. दुकानावर शेतमालाची आवक वाढावी याकरिता अाँटोचालकांना प्रती पोत्यामागे २५ रुपये कमिशन दिले जात असल्याचा आरोपही शेतकरी, हमाल व मापार्यांनी केला आहे.
अनसिंग येथे शेतमालाची अवैध खरेदी!
By admin | Published: October 12, 2015 2:03 AM