जिल्ह्यासह भर जहागीर व संपूर्ण रिसोड तालुक्यात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत; मात्र, अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे. बुलडाणा, जालना जिल्ह्यातील तळणी, कानडी, देवठाणा, भवन, उस्वद, लिंबखेडा आदी ठिकाणच्या वाळूघाटांवरून वाटेतील पाच ते सहा चेकपोस्ट लिलया पार करत तथा सर्व नियम धाब्यावर बसवून ओव्हरलोड वाळू वाहतूक खुलेआम सुरू आहे. तथापि, ओव्हरलोड वाळू वाहतुकीस निर्बंधातून सूट मिळाली काय, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या वाहनांमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती बसलेले असतात. या वाहनांना डिझेल कुठून उपलब्ध होते, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून वाशिम जिल्ह्यात खुलेआम प्रवेश करणाऱ्या अवैध वाहतुकीच्या या वाहनांना कुठेच कुणी का थांबवत नाहीत, असा सवालही यानिमित्ताने केला जात आहे.
....................
कोट :
जालना, बुलडाणा या जिल्ह्यांमधून वाशिम जिल्ह्यात वाळू घेऊन येणाऱ्या अनेक वाहनांवर गेल्या काही दिवसांत कारवाई करण्यात आलेली आहे. याउपरही अवैध वाळू वाहतूक सुरूच असेल तर निश्चितपणे चाैकशी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात येईल.
- समाधान जावळे, मंडल अधिकारी