वाशिम : गौण खनिजाचे अवैध उत्खनन करीत वाहतूक करणाऱ्या चार वाहनांना पकडून रिसोड तहसिलदारांच्या पथकाने १३ लाखांचा दंड ठोठावण्याची कारवाई १० मे रोजी केली.
रिसोड तालुक्यात एकूण १७ रेती घाट आहेत. मुरूम, रेती आदी गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी कारवाईची धडक मोहिम हाती घेतली आहे. बुधवारी (दि.१०) तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी रिसोड ते मालेगाव मार्गावरील किनखेडा, पेडगाव परिसरात गौण खनिजाचे अवैध उत्खनन करताना आढळून आल्याने, काही वाहनांवर तात्काळ दंडात्मक कारवाइ केली. याशिवाय शेलगाव येथे एका पोकलेन मशिनसह दोन टिप्पर तसेच महागाव येथे एक रेती ट्रॅक्टरही पकडला.
या सर्व वाहनांवर १३ लाख रुपयांचा दंड ठोठावला तसेच पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी वाशिम यांच्याकडे प्रस्ताव पाठविला. तहसीलदार तेजनकर यांनी एका ठिकाणी फिल्मी स्टाइलने वाहनाचा पाठलाग केला तर वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापा टाकून कारवाईची मोहिम राबविल्याने मुरूम, रेती तस्करांचे धाबे दणाणले.