लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी सण, उत्सवाच्या पृष्ठभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३० आॅगस्ट रोजी स्थानिक महाराणा प्रताप चौकातील मुकेश ठाकूर यांच्या घरात झाडाझडती घेतली असता, विनापरवाना घातक शस्त्रे आढळून आले. याप्रकरणी आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला असून, पोलिसांनी आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिनकर शिवाजीराव गोरे यांना गुप्त माहिती मिळाली की, मुकेश ठाकुर रा. महाराणा प्रताप चौक वाशिम हा आपल्या राहते घरात विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे बाळगतो. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या निर्देशानुसार, मुकेश ठाकुर यांच्या मलंगशा बाबा दर्गाहजवळ, शुक्रवारपेठ वाशिम येथील राहत्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी सहा तलवारी, एक खंजीर, एक चाकू, एक फरशी कुन्हाड असे एकुण ९ घातक शस्त्रे आढळून आली.यावेळी पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी हे महिलांना घरझडतीचा उद्देश समजावून सांगत असताना, आरोपी मुकेश दुर्गासिंग ठाकुर हा घराचे पहिल्या माळयावरुन शेजारचे घराचे छतावर उडी मारुन घरामागील मोकळया जागेतुन पळुन जाण्यास यशस्वी झाला. कारवाई दरम्यान राहत्या घरात बेकायदेशीररित्या घातक शस्त्रसाठा मिळुन आल्याने आरोपी मुकेश दुर्गासिंग ठाकुर याचेविरुध्द पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा १९५९ व सह कलम १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण, पोलीस निरिक्षक शिवा ठाकरे यांचे मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
आगामी सण, उत्सवादरम्यान शांतता राहावी म्हणून अवैध शस्त्रसाठा व गुंड प्रवृत्तीच्या इसमांची शोध मोहिम राबविली जात आहे. वाशिम शहरात अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई केली.- वसंत परदेशीजिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम