लोकमत न्यूज नेटवर्कमानाेरा : तालुक्यातील वाईगौळ येथील शेतकरी ध्रुव परसराम राठोड यांच्या शेतातील मानोरा दिग्रस या निर्माणाधीन महामार्गाच्या बांधकाम दरम्यान बांधकाम कंत्राटदार कंपनीने बेकायदेशीररित्या पोकलॅण्ड मशीनने एक सागवान वृक्ष मुळासकट पाडून आणि इतर सत्तेचाळीस झाडांना मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याप्रकरणी ३३ हजार रुपये दंड करण्यात आला. राठाेड यांनी यासंदर्भात तक्रार वन विभागाकडे केली होती. शेतकरी ध्रुव परसराम राठोड यांच्या मालकीचे ६६१ गट नं. मधील शेताच्या धुऱ्यावर यांनी मोठ्या प्रमाणात सागवान झाडाची लागवड केली हाेती. या सागवान झाडाची मोठ्या प्रमाणात नासधूस आर. एन. एस. इन्फ्रा. कं. लि. हुबळी यांच्या पोकलॅण्डद्वारा काम करीत असताना करण्यात आल्याची तक्रार शेतकरी राठोड यांनी मागील वर्षाच्या सातव्या महिन्यात वनविभागाकडे केली हाेती . शेतकरी ध्रुव राठोड यांच्या तक्रारीवरून बांधकाम कंपनीद्वारा राठोड यांच्या शेतातील खोदकामामुळे एक सागवनाचे झाड पूर्णपणे जमिनीवर पडले असून इतर ३८ झाडांचे नुकसान झाल्याचा पंचनामा वन प्रशासनाकडून करण्यात आला. वृक्ष अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी मानोरा यांनी क्षेत्र सहाय्यक मानोरा यांनी गैर अर्जदार यांचे समक्ष शेतकरी राठोड यांच्या शेताचा मोकास्थळ पंचनामा व त्या अनुषंगाने या कार्यालयाला सादर केलेला अहवाल या सर्व बाबी ग्राह्य धरून कंत्राटदार कंपनीला सागवान प्रजातीची एकूण ३३ झाडे व इतर प्रजातीची एकूण सहा झाडांचे नुकसान केल्यामुळे तेहतीस हजार रुपये एवढा दंड आर. एन. एस. इन्फ्रा. या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम करणाऱ्या कंपनी प्रशासनाला केला आहे. कुठल्याही प्रकारचे वैध कागदपत्रे कंपनी प्रशासनाकडे नसतानाही जबरदस्तीने माझ्या शेतीचे खोदकाम करून मोठ्या कष्टाने लावून संगोपन केलेल्या मौल्यवान सागवनाच्या झाडांची तोड आणि नासधूस करून माझे मोठे आर्थिक नुकसान या महामार्ग बांधकाम कंपनीने केले आहे. - ध्रुव परसराम राठोड बाधित शेतकरी ,वाईगौळ
बेकायदेशीररित्या झाडे ताेडली; कंत्राटदार कंपनीला ३३ हजार रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 12:58 PM