नंदकिशोर नारे
वाशीम : राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाचा तसेच सरकारी नोकरभरती खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा तुघलकी निर्णय तात्काळ रद्द करण्यासाठी समनक जनता पार्टीच्या वतीने २१ सप्टेंबर रोजी शासनाला राज्यव्यापी निवेदन देण्यात आले. याचाच भाग म्हणून वाशीम येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास राज्यात ठिकठिकाणी रस्तारोको आंदोलनाचा ईशारा यावेळी देण्यात आला.
समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते डॉ. अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनात राज्यात विविध जिल्हा व तालुकास्तरावर गुरुवारी शासनास निवेदन देण्यात आले. वाशीम येथे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्रातील सर्व सरकारी शाळा कंत्राटी पद्धतीने उद्योगपतींना चालविण्यास देणार असल्याचा शासन निर्णय नुकताच शासनाने काढला आहे. तसेच सरकारी नोकर भरती ही खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याबाबतचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. हे दोन्हीही निर्णय पुरोगामी महाराष्ट्राला खाईत लोटणारे आहेत. शिक्षण हक्क कायद्याला पायदळी तुडविणारे आहेत. आरक्षण संपविणारे आहेत. त्यामुळे हे निर्णय तात्काळ रद्द करावेत.
आदी प्रमुख मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास येत्या २६ सप्टेंबर रोजी राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर महिला जिल्हाध्यक्ष शितल राठोड, प्रा. डॉ. माणिक राठोड, ऍड. संगीता राठोड, वनिता पवार, सुशीला राठोड, प्रतिभा राठोड, विमल राठोड, सुनील राठोड, गजानन वाघमारे, स्वप्निल आडे, ऋषिकेश राठोड, जयश्री राठोड, स्वाती राठोड, सुधा जाधव, प्रीती ढेरे, पार्वती इढोळे, ललिता पवार, अजय सोनुनकर, वाशिम शहराध्यक्ष रवींद्र राजू काळे, खुशाल राठोड, भीमराव राठोड, शेषराव राठोड, मीरा राठोड, प्रमिला आडे, कल्पना राठोड, सीमा राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.