लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संचमान्यतेमध्ये दुरुस्ती करुन शाळा व महाविद्यालयांची सुधारीत पटसंख्या निर्धारित करण्यात यावी, या मागणीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सोमवारी दिली. यासंदर्भात त्यांनी सांगितले, की संचमान्यतेमध्ये पुर्वी इयत्ता पाचवीकरिता २० विद्यार्थी संख्या तसेच सहावी ते आठवीकरिता ३५ विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे धोरण ठरविण्यात आले; परंतु सद्या विविध स्वरूपातील कारणांमुळे सर्वच ठिकाणच्या शाळांची पटसंख्या रोडावली आहे. त्यामुळे पटसंख्या धोरणात देखील बदल होणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. तथापि, इयत्ता पाचवीमध्ये १५ विद्यार्थ्यांमागे १ तसेच इयत्ता सहावी ते आठवीकरिता ३५ पटसंख्येऐवजी २५ ते ३० विद्यार्थीसंख्या ठेवावी. यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमधील पटसंख्या देखील निर्धारित करण्यात यावी. यासाठी संचमान्यतेमध्ये बदल व्हायला हवा, अशी मागणी प्रधान सचिवांकडे केल्याचे भोयर यांनी सांगितले.
शाळा, महाविद्यालयांच्या पटसंख्येत सुधारणा करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 2:54 PM