संतोष वानखडे, वाशिम : मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले अन् इकडे वाशिम जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याबाबत सोशल मीडियावर अफवांचा बाजार तेजीत आला. काही वेळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले; परंतु त्यानंतर वाशिम जिल्ह्यात भूकंपाची अफवा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सकाळी ६:१० वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्क जाणवले. याबाबत सोशल मीडियात माहिती व्हायरल झाली. त्यानंतर वाशिम शहरात तसेच रिसोड शहरातही सकाळी ६:१० वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती सोशल मीडियात प्रचंड वेगाने व्हायरल झाली. त्यामुळे काही वेळेसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणही होते. भूकंपाबाबतच्या माहितीची खातरजमा करण्यासाठी अनेकांनी माध्यम प्रतिनिधींसह अधिकाऱ्यांशी संपर्क साधले. वाशिम जिल्ह्यात कुठेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. सोशल मीडियात गुरूवारी दुपारपर्यंत भूकंपाबाबतच्या अफवांचे मेसेस व्हायरल होत होते.
वाशिम जिल्ह्यात कुठेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची नोंद नाही. वाशिम व रिसोड शहरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची केवळ अफवा होती. या अफवेवर कोणीही विश्वास ठेवू नये.- शाहू भगत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम