संतोष वानखडे
वाशिम : आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवास २६ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला असून, मोठ्या उत्साहात नवदुर्गेचे आगमन झाले. जिल्ह्यात ५१७ सार्वजनिक मंडळांकडून दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली.
कोरोनाचे संकट असल्याने २०२० आणि २०२१ अशा दोन वर्षांत घरगुती पद्धतीने दुर्गोत्सव साजरा झाला होता. यंदा कोरोना नियंत्रणात असल्याने आणि कोणतेही निर्बंध नसल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत आलेली मरगळ झटकून जिल्हावासियांनी बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले होते. आता २६ सप्टेंबर जिल्ह्यात नवदुर्गेचे हर्षोल्हासात आगमन झाले. बाजारपेठा सकाळपासून भक्तांच्या गर्दीने फुलल्या होत्या. दुपारपर्यंत नागरिकांनी मूर्ती खरेदी केली तर त्यानंतर सार्वजनिक मंडळांनी मोठ्या मूर्ती घेण्यासाठी एकच गर्दी केली.
ढोलताशाचा गजरात जिल्हावासियांनी नवदुर्गेचे स्वागत केले. यंदा जिल्ह्यात ५१७ सार्वजनिक मंडळांनी दुर्गादेवीची स्थापना केली. यामध्ये शहरी भागात १७१ आणि ग्रामीण भागातील ३६५ मंडळांचा समावेश आहे. कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.