संतोष वानखडे, वाशिम : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची पदभरती जवळपास आटोपली. दुसरीकडे खासगी अनुदानित शाळेवरील माध्यमिक शिक्षक पदभरती निवडणूक आचारसंहितेमुळे आणखी लांबणीवर पडली आहे. या पदभरतीकडे उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण केलेल्या जिल्हा परिषद शाळांवर पात्र शिक्षकांना थेट नियुक्ती देण्यात आली. पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे खासगी अनुदानित शाळेवरील शिक्षक पदभरतीबाबतची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. शिक्षक पदांकरिता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागविले होते. खासगी अनुदानित माध्यमिक शाळांवर देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आणि आता राज्यातील विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता यामुळे खासगी अनुदानित शाळांवरील शिक्षक पदभरती लांबणीवर पडत आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर खासगी अनुदानित शाळांवरील शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीचे वेळापत्रक वरिष्ठ स्तरावरून जिल्हास्तरीय यंत्रणेला प्राप्त होईल, असे वाशिमच्या माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
एका पदासाठी पुन्हा १० उमेदवार-
खासगी अनुदानित शाळांमध्ये (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षक भरतीची पद्धती पुन्हा बदलली आहे. सुरुवातीला खासगी अनुदानित शाळांमध्ये एका रिक्त पदासाठी १० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येत होते. त्यानंतर यामध्ये बदल करीत एका पदासाठी तीन उमेदवार निश्चित करण्यात आले. आता पुन्हा एका पदासाठी १० उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संबंधित शाळांमध्ये मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे.