नंदकिशाेर नारे, वाशिम :वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गावकऱ्यांकडून पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असून, संबंधित ग्रामपंचायतींनी पाणीटंचाई निवारणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ३७ गावांसाठी ३४ विहीर अधिग्रहण आणि ३ कूपनलिका अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. या उपाययोजना संबंधित गावात राबविण्यात येत आहेत.
जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यंतरापासूनच पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या होत्या. अनेक गावांत पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींकडून पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्याबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येऊ लागले.
दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी १८८ गावांकरिता २१८ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. यासाठी १ कोटी ६६ लाख ७४ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडाही तयार केला होता. या कृती आराखड्यानुसार पाणीटंचाई निवारणासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येत आहे. यात ९ मेपर्यंत ३७ गावांसाठी १७ लाख रुपये खर्चाच्या ३७ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ३४ विहिरी आणि ३ कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.