संतोष वानखडे, वाशिम : ईअर टॅगिंग (कानावर शिक्के) नसलेल्या जनावरांची १ जूनपासून खरेदी-विक्रीसंदर्भात कोणतीही नोंद करू नये, अशा स्पष्ट सूचना पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील गुरांच्या बाजार प्रशासनाला दिलेल्या आहेत. ४.९१ लाखांपैकी आतापर्यंत केवळ १.६८ लाख जनावरांचे ईअर टॅगिंग झाल्याचे सांगण्यात येत असल्याने ‘ईअर टॅगिंग’विनाच खरेदी-विक्री होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात २०१९ च्या पशुगणनेनुसार ४ लाख ९१ हजार ६७४ जनावरे आहेत. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत. ही प्रणाली पशुधनासाठी सर्व प्रकारचे ईअर टॅगिंग रेकॉर्ड करणार आहे. परिणामी, जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यता उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचा तपशील यासारखी माहिती शासनाकडे राहणार आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ‘कानावर शिक्के’ असल्याशिवाय १ जून २०२४ नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री, उपचार केले जाणार नाहीत, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले होते. २५ जूनपर्यंत जिल्ह्यातील केवळ १.६८ लाख जनावरांचे ईअर टॅगिंग झाले. हा आकडा नगण्य असल्याने नैसर्गिक आपत्तीत जनावरांची हाणी झाल्यास ईअर टॅगिंग अभावी शासकीय मदत मिळणे कठीण होईल, अशी भीतीही वर्तविली जात आहे.
जनावरांचे ईअर टॅगिंग अनिवार्य आहे. ईअर टॅगिंग नसल्यास जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार १ जूनपासून बंद करावे, याबाबत गुरांच्या बाजार प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या आकडेवारीनुसार १ लाख ६८ हजार जनावरांचे ईअर टॅगिंग झाले. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी नजीकच्या पशुचिकित्सा केंद्रात जावून जनावरांचे ईअर टॅगिंग करून घ्यावे.- डॉ. सुनिल अहिरे,प्रभारी उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग वाशिम