वाशिम: गेल्या काही वर्षांपासून आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वाशिमच्या टेम्पल गार्डनला मंगळवार २६ सप्टेंबर रोजी आग लागली. यात या गार्डनमधील तारांगण (प्लॅनेटोरियम) जळून खाक झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली. त्याचे कारण मात्र कळू शकले नाही.
वाशिम शहरात नगर पालिकेच्यावतीने मागील काही वर्षांपूर्वी विदर्भातील एकमेव असे टेम्पल गार्डन निर्मितीचे काम करण्यात आले. हे टेम्पल गार्डनचे लोकार्पण करून ते जनसेवेत रुजू करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यात या कामात प्रचंड अनियमितता झाल्याचेही आरोप करण्यात येत होते.
१० एप्रिल रोजी हे टेम्पल गार्डन जनेसेवेत रुजू करण्यासाठी आंदोलनही करण्यात आले. तथापि, हे टेम्पल गार्डन जनेसेवेत रुजू होण्यापूर्वीच मंगळवार २६ सप्टेंबर रोजी या टेम्पल गार्डनला आग लागली. यात टेम्पल गार्डनमधील बहुप्रतिक्षीत प्लॅनेटोरियम जळून खाक झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी विद्युत पुरवठा नसल्याने शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली नसल्याचे स्पष्ट होते. तथापि, नेमकी आग कशामुळे लागली, हे कारण स्पष्ट झाले नाही.
टेम्पल गार्डनला दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. यात गार्डनमधील प्लॅनेटोरियमचे मोठे नुकसान झाले. तथापि, आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नसून, ही आग कशामुळे लागली. त्याची माहिती घेतली जात आहे.- निलेश गायकवाड,मुख्याधिकारी, नगर परिषद वाशिम