वाशिम : अकोला जिल्ह्यातून विभाजन होत नव्याने वाशिम जिल्हा निर्मितीला येत्या जुलै महिन्यात २५ वर्षे पूर्ण होतात; मात्र इतक्या प्रदिर्घ कालावधीतही याठिकाणी अद्यापपर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार सुरू होऊ शकला नाही. म्हणायला, चार वर्षांपूर्वी वाशिमात तब्बल साडेचार कोटी रुपये खर्चून या विभागासाठी टोलेजंग इमारत उभी झाली; परंतू अपेक्षित मनुष्यबळ नसल्याचा मुद्दा ‘एफडीए’ने समोर केला. यामुळे इमारत हस्तांतरण प्रक्रिया अधांतरी लटकली असून मूळ उद्देश असफल झाला आहे.
शिळे, मुदतबाह्य आणि खाण्यायोग्य नसलेले अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठविणे. नमुने अयोग्य आढळून आल्यास संबंधित खाद्यपदार्थ निर्माता व विक्रेत्यावर नियमानुसार कारवाई करणे, थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित औषधींचा दर्जा तपासून चुकीच्या प्रकारावर नियंत्रण मिळविणे, गुटखा वाहतूक व विक्रीप्रकरणी कारवायांमध्ये सातत्य राखणे यासह इतरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार वाशिम जिल्ह्यात आधीपासूनच ढेपाळला आहे.या विभागाचे मुख्यालय अकोला येथेच असून वाशिम जिल्ह्याला तुलनेने कमी मनुष्यबळ देण्यात आले आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे कार्यरत कर्मचाऱ्यांकडे इतरही ठिकाणचा प्रभार सोपविण्यात आल्याने कामकाज प्रभावित होत आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे मुख्यालय वाशिम शहरात होण्याच्या दृष्टीने शासनाने चार वर्षांपूर्वी साडेचार कोटी रुपये खर्चून टोलेजंग इमारत याठिकाणी उभी केली; मात्र इमारत उद्घाटन आणि लोकार्पणाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. याप्रकरणी एफडीए आणि पीडब्ल्यूडी या दोन्ही यंत्रणांनी टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे प्रश्न आजही ‘जैसे थे’ असल्याचे दिसत आहे.वाशिम येथे अन्न व औषध प्रशासनाची इमारत बांधून सज्ज आहे. इमारतीमध्ये विद्युत फिटींगची कामे पूर्ण झाली आहेत. फर्निचर व्यवस्थाही केली जात आहे. कर्मचाऱ्यांची पदे निश्चितपणे रिक्त आहेत. प्रश्न सुटताच नव्या इमारतीत वाशिम एफडीएचा कारभार सुरू होईल.- भाऊराव चव्हाण, सहायक आयुक्त, अन्न प्रशासन