वाशिम : स्थानिक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उदघाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते शनिवारी झाले.
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आणि शासकीय जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. एस. एम. सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरिभाऊ क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून ही अभ्यासिका सुरु झाली आहे. उदघाटन समारंभाला जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर, गिरिधारीलाल सारडा, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्याच्या स्पर्धेच्या युगात वाशिमसारख्या छोट्या शहरातील विद्यार्थी मागे राहू नयेत तसेच विद्यार्थ्यांना विविध ग्रंथ, पुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सदर अभ्यासिका सुरू करण्यात आल्याचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आणि शासकीय जिल्हा ग्रंथालय प्रशासनाने स्पष्ट केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय पाटील, ग्रंथपाल डॉ. प्रज्ञा क्षीरसागर तसेच शासकीय जिल्हा ग्रंथालयाने केले.