पावसाळा सुरू झाल्यानंतर सापांच्या अधिवासात पाणी शिरते. त्यामुळे त्यांचा जमिनीवर संचार वाढतो. या प्रकारातून अनावधानाने सर्पदंशाच्या घटना घडतात. जिल्ह्यात अवघ्या महिनाभरात सहा जणांना विषारी सापाने चावा घेतल्याच्या घटना घडल्या. यात घोणस, मण्यार आणि नाग या विषारी सापांच्या चाव्यांचाच समावेश आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चिंचाळा येथे एक, तर येडशी येथे दोन, शिवाय मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात सर्पदंशाच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यापैकी चिंचाळा येथे नागाने चावा घेतलेल्या २२ वर्षीय युवकाला, तर येडशी येथे मण्यार सापाने चावा घेतलेल्या ३ मुलीचा मृत्यू झाला. शिरपूर परिसरातील शेलगाव खवणे येथील एका ४० वर्षीय इसमासह परिसरातील आणखी एका गावातील महिलेचाही विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याशिवाय कारंजा तालुक्यातील काठेवाडी येथील एका व्यक्तीला मण्यार सापाने चावा घेतल्याची घटना घडली.
-----------
३ वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू
पावसाळ्याच्या दिवसांत सर्पदंशाच्या घटनांत मोठी वाढ होत असताना दक्षता बाळगणे अत्यावश्यक आहे. मंगरुळपीर तालुक्यातील येडशी येथील राजश्री शंकर गव्हाने या तीन वर्षीय चिमुकलीस १७ जुलै रोजी रात्री २ वाजता अतिविषारी मण्यार सापाने दंश केला; पण उपचारास विलंब झाल्यामुळे या चिमुकलीचा अखेर मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी येथे एका युवकाला विषारी सापाने चावा घेतला. निसर्ग स्पर्श फाउंडेशनचे सर्पमित्र आदित्य इंगोले यांनी युवकाच्या घरी जाऊन मार्गदर्शन केल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला.
-------------
वैद्यकीय उपचारच आवश्यक
सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. याबाबत सर्पमित्र, वन्यजीवप्रेमी ग्रामीण, शहरी भागांत व्यापक जनजागृती करीत असतानाही बहुतांश घटनांत अद्यापही मंत्रोपचार किंवा बुवाबाजीच्या आधारे सर्पदंशावर उपचाराचे प्रयत्न होतात. यातूनच बाधित व्यक्तीचा मृत्यू होतो. सर्पदंशावर केवळ वैद्यकीय उपचार हाच पर्याय असल्याचे जिल्ह्यातील सर्पमित्र आणि आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.
------
कोट: जिल्ह्यात प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे चारच अतिविषारी साप आढळतात. या सापाने दंश केल्यानंतर सर्पदंश झालेल्यास तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. शासकीय रुग्णालयात योग्य उपचारामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. दुर्दैवाने आजही अनेक लोक सर्पदंशानंतर बुवाबाजी किंवा मंत्रोपचाराचा आधार घेतात.
- गौरवकुमार इंगळे,
सर्पमित्र, तथा मानद वन्यजीवरक्षक
जिल्हा वाशिम