...................
कूपनलिकांच्या पातळीत लक्षणीय घट
वाशिम : शहर परिसरातील कूपनलिकांच्या पाणीपातळीत मे महिन्याच्या प्रारंभी लक्षणीय घट झालेली आहे. यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.
..............
ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त
वाशिम : जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची चोख अंमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्या दिवशी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याचे पाहावयास मिळाले.
.................
रसवंती चालकांचे प्रचंड नुकसान
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. यामुळे आधी सकाळी ७ ते ११ आणि आता संपूर्ण बंदचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. यामुळे विशेषत: उन्हाळ्यात चालणाऱ्या रसवंती चालकांचे नुकसान होत आहे.
..................
वाशिम तालुक्यात १४२ बाधित
वाशिम : आरोग्य विभागाकडून ९ मे रोजी प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यात १४२ नागरिकांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. हा आकडा इतर पाच तालुक्याच्या तुलनेत सर्वाधिक असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
.........................
ग्रामीण भागात आरोग्य तपासणी
वाशिम : ग्रामीण भागात दरदिवशी कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग ग्रामस्थांची तपासणी करीत आहे. त्यात आठवडाभरात हजारापेक्षा अधिक ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.
.........................
किसान सन्मानच्या लाभाची प्रतीक्षा
इंझोरी : जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. प्रशासनाच्या निर्देशानुसार बँक खाते, आधारकार्डसह नावात दुरुस्ती करूनही त्यांना योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही.
00000000000
जऊळका येथे १० कोरोनाबाधित
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील १० जणांचा कोरोना चाचणी अहवाल ९ मे रोजी पाॅझिटिव्ह आला. यामुळे गावात एकच खळबळ माजली असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
...........................
आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
धनज बु. : कारंजा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त असल्यामुळे परिसरातील गोरगरिबांना उपचारात अडचणी येत आहेत. वैद्यकीय अधिकारीही नसल्याने ग्रामस्थांची पंचायत झाली आहे.
000000000000
तलाठ्याचे पद सहा महिन्यापासून रिक्त
इंझोरी : येथे कार्यरत तलाठी सतीश दाभाडे यांची काही महिन्यापूर्वी बदली झाल्याने हे पद रिक्त झाले. तेव्हापासून इतर तलाठ्याकडे गावाचा प्रभार देण्यात आला आहे. ते नियमित येत नसल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे.
.....................
काजळेश्वर-पलाना रस्त्याची दुरवस्था
काजळेश्वर : काजळेश्वर-पलाना या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावरील डांबर निघाल्याने खडी उघडी पडून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांचे नियंत्रण सुटून मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
......................
जीवघेणा खड्डा, अपघाताची भीती
वाशिम : मानोरा ते कारंजा या मुख्य रस्त्यावरील धामणी गावाजवळ मोठा खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेने हा खड्डा बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.
.......................
वीज मीटरअभावी जोडण्या रखडल्या
वाशिम : जिल्ह्यात भूमिगत वाहिनीसाठी महावितरणकडून एअर बंच केबल टाकण्यात आले आहे. त्यामुळे रीतसर वीज जोडणीसाठी ग्राहकांची धडपड सुरू आहे. परंतु महावितरणकडे वीज मीटरच उपलब्ध नसल्याने शेकडो ग्राहकांची वीज जोडणी रखडली आहे.